Friday, September 25, 2015

चला मंगळावर राहायला!

१९९४ साली शुमेकर नावाचा लघुग्रह (Asteroid) गुरू ग्रहावर आदळला होता. मी त्यावेळी सहा वर्षांचा होतो पण आजदेखिल मला ती घटना ठळकपणे आठवते आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनादेखिल आठवत असेल. प्रसिद्धिमाध्यमांमध्ये ही घटना त्या काळी अत्यंत लोकप्रिय झाली होती आणि आमच्याकडे तर ही घटना घडण्याच्या अगोदर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळून सर्व मानवजात नष्ट होणार अशी अफवादेखिल पसरली होती. अर्थात ही अफवा असली तरी पृथ्वीवर मोठा उल्कापात होण्याची शक्यता आपल्याला अगदीच नाकारता येत नाही. खरेतर छोट्या मोठ्या उल्का पृथ्वीवर आदळतच असतात पण पृथ्वीच्या वातावरणातच त्या नष्ट होत असल्याने त्यांचा फारसा धोका जाणवत नाही. मात्र बऱ्याच मोठ्या उल्का पृथ्वीवर आदळल्याच्या घटनादेखिल बऱ्याचदा घडल्या आहे. इ.स.१९०८ साली अशाच मोठ्या धडकेने रशियातील बरेच मोठे जंगल नष्ट नष्ट झाले होते (Tunguska event). त्याचप्रमाणे डायनॉसरसारखे प्रचंड प्राणीदेखिल अशाच घटनेमुळे पृथ्वीवरून नष्ट झाल्याचा अंदाज आहे. लघुग्रह किंवा उल्का या गोष्टींची धडक जशी मानवजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकते त्याचप्रमाणे प्रचंड जंगलतोड, सतत वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची भासणारी टंचाई, बदलते हवामान, आण्विक युद्धाची शक्यता अशा अनेक गोष्टी पृथ्वीवरून मानवजात संपूर्णपणे नष्ट करू शकतात. त्यामुळे जर मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आज नाहीतर उद्या आपल्याला पृथ्वी सोडून बाहेर कोठेतरी आसरा शोधावाच लागणार आहे. आपल्याच सूर्यमालेतील इतर ग्रह हे यासाठी नैसर्गिकपणे आपली पहिली निवड असणार. यानंतरचा प्रथम प्रश्न म्हणजे सूर्यमालेतील कोणता ग्रह वास्तव्यासाठी निवडायचा? चंद्र आणि शुक्र (Venus) हे दोन पृथ्वीला अत्यंत जवळ असणारे ग्रह आहेत आणि त्यामुळे तुलनेने या ग्रहांवर पोहोचणे मानवाला सोपे आहे. चंद्रावर तर आपण कित्येक वर्षांपूर्वीच जाऊनदेखिल आलो आहोत. परंतु मानवाच्या वास्तव्यासाठी हे दोन ग्रह अजिबातच उपयोगी नाहीत. चंद्रावर आपल्याला हव्या असणाऱ्या नैसर्गिक गोष्टी जवळपास अस्तित्वात नाहीत आणि विविध हानिकारक प्रारणांपासून (Radiation) मानवाचे रक्षण करण्यासाठी तेथे वातावरणदेखिल नाहीये. याचबरोबर चंद्रावर दिवस आणि रात्र पृथ्वीचा एक महिना एवढे मोठे असतात आणि त्याबरोबर जुळवून घेणे आपल्याला अत्यंत कठिण आहे! शुक्राबद्दल तर विसरून गेलेलेच बरे. शुक्रावरील तापमान ४०० डिग्री सेल्सिअस इतके प्रचंड आहे (१०० डिग्री ला पाणी उकळू लागते) आणि वातावरणाचा दाब पृथ्वीवरील खोल समुद्रात असणाऱ्या पाण्याचा दाबाएवढा आहे! याबरोबरच बक्षिस म्हणून मधे मधे आम्लाचा पाऊसदेखिल (Acid rain) येतो! या दोघांच्या तुलनेत मंगळ हा ग्रह म्हणजे स्वर्गच म्हणायला हवा.

मंगळ ग्रह
 मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे २२५,३००,००० किलोमीटर्स आहे. हे अंतर प्रचंड वाटत असले तरी ते आपल्या तंत्रज्ञानाच्या आवाक्यात आहे. मंगळ ग्रहाच्या इतर गोष्टीदेखिल मानवाला पूरक आहेत. उदाहरणार्थ, मंगळाच्या मातीत पाणी अस्तित्वात आहे. मंगळ खूप उष्ण किंवा खूप थंड नाहीये आणि सौर उर्जेवर चालणारी उपकरणे वापरण्यासाठी पुरेसा सुर्यप्रकाश तेथे उपलब्ध आहे. मंगळावरील दिवस जवळपास पृथ्वीएवढाच म्हणजे २४ तास आणि ४० मिनिटांचा आहे आणि विरळ असले तरी सौरप्रारणापासून आपले रक्षण करण्यासाठी पृथ्वीसारखे वातावरण तेथे अस्तित्वात आहे. मंगळाचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत ३८% आहे. कमी असले तरी तज्ञांच्या मते या गुरुत्वाकर्षणात मानवांना जुळवून घेता येऊ शकते.

कोणत्याही नवीन जागी राहण्याची पहिली पायरी असते त्या जागेचे सर्वेक्षण. मंगळ ग्रहासाठीदेखिल हे लागू पडते. अलिकडच्या काळात आपल्याला मंगळ ग्रहाची बरीच चांगली माहिती उपलब्ध झाली आहे आणि होते आहे. याचे कारण म्हणजे विविध देशांनी या ग्रहाची माहिती मिळवण्यासाठी राबवलेल्या मोहीमा. सध्या मंगळाच्या पृष्ठभागावर अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने पाठवलेली अपोर्च्युनिटी (Opportunity) आणि क्युरिओसिटी (Curiosity) ही दोन रोव्हर्स (Rovers) अस्तित्वात आहेत आणि ही रोव्हर्स मंगळाच्या पृष्ठभागावर फिरून तिथली विविध माहिती, छायाचित्रे आणि विदा (Data) पृथ्वीवरील संशोधकांना पाठवत असतात. त्याचप्रमाणे मंगळाच्या कक्षेत फिरून त्याबद्दल माहिती मिळवणारी पाच याने सध्या अस्तित्वात आहेत. यामध्ये नासानेच पाठवलेले मार्स ओडिसी, युरोपियन स्पेस एजन्सीने पाठवलेले मार्स एक्सप्रेस, कॅल्टेक व नासाने पाठवलेले एम आर ओ, भारताच्या इस्त्रोने पाठवलेले मंगळयान आणि नासाचे मावेन यांचा समावेश होतो. या सर्वांनी दिलेल्या माहितीमधून मंगळाच्या मातीत असणारे पाण्याचे अस्तित्व आणि मंगळाच्या उत्तर ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात असणारे पाण्याचे अस्तित्व उघड झाले आहे.

हे सगळे असूनदेखिल मंगळावर मानवाने अजूनपर्यंत पाऊल ठेवलेले नाहीये आणि हीच कमतरता भरून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे "मार्स वन" (Mars One) या खाजगी प्रकल्पाने. २०११ साली स्थापीत झालेल्या या प्रकल्पाने २०२७ पर्यंत मंगळावर मानव पाठवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र यात एक विचित्र वाटणारी गोष्टदेखिल निश्चित करण्यात आली आहे : या मोहिमेत एकदा मंगळावर गेलेल्या व्यक्ती परत येणार नाहीत! होय. या प्रकल्पातुन जे लोक खरोखर मंगळावर जातील ते तिथेच आपले उर्वरित आयुष्य व्यतित करतील अशी योजना आहे. याचे कारण म्हणजे जर हे लोक परत येणारच नसतील तर संपूर्ण मोहीमेचा किचकटपणा प्रचंड कमी होतो कारण येण्यासाठीचे तंत्रज्ञान आणि साधनसामुग्री यांची उपाययोजना करण्याचे प्रयोजनच उरत नाही. पण मग तुम्ही विचार करत असाल की अशा मोहीमेसाठी जायला कोण कशाला तयार होईल? पण जगात खूप वेगळा विचार करणारी माणसेदेखिल प्रचंड प्रमाणात अस्तित्वात असतात. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरचा दौरा करण्यासाठी जेव्हा १९०० सालाच्या आसपास अर्नेस्ट शॅकलटनने (Ernest Shackleton) ठरवले तेव्हा सोबत हव्या असणाऱ्या व्यक्ती मिळवण्यासाठी त्याने वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये असे म्हटले होते:  "अत्यंत खडतर प्रवासासाठी माणसे हवी आहेत. पगार बराच कमी मिळेल, प्रचंड थंडी सोसावी लागेल, संपूर्णपणे अंधारात काही महीने काढावे लागू शकतात, सतत धोक्याच्या छायेत वावरावे लागेल आणि परतण्याची शाश्वती देता येत नाही. यशस्वीपणे परत आल्यास प्रचंड प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळेल!" आता अशी जाहिरात वाचून कोण जायला तयार होणार? पण या शॅकलटनला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तो यशस्वीपणे मोहिम फत्ते करून आला! "मार्स वन" मोहीमेतदेखिल असेच काहीसे आहे. बऱ्याच व्यक्तींसाठी मंगळावर कायमस्वरूपी जाऊन राहाणे स्वप्नवत असेल. पृथ्वीपासून लाखो किलोमिटर्स दूर राहून रात्री अंतराळात दिसणाऱ्या एका ठिपक्यावर आपण जन्माला आलो होतो ही भावना त्यांच्यासाठी अत्यंत रोमांचक असेल. त्याचप्रमाणे कोलंबसने जसा अमेरिकेचा शोध लावून आपले नाव इतिहासात अजरामर करून ठेवले आहे तसे या व्यक्तींच्या बाबतीत होणार आहे. मात्र मार्स वन मोहीम यादेखिल पुढची आहे. या मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात चार अंतराळवीर मंगळावर पाठवले जातील आणि त्यानंतर प्रत्येक दोन वर्षांनी आणखी चार अंतराळवीर पाठवले जातील. अशा प्रकारे थोडे-थोडे करून मंगळावर कायमची मानवी वसाहत उभारायची अशी ही योजना आहे!

मंगळावरील मार्स वन वसाहत सुरुवातीला अशी दिसेल (www.mars-one.com)

मंगळावरचे जीवन कसे असेल? २०२५ मधे जो जथ्था मंगळाकडे कूच करेल त्याला साधारण ६ ते ८ महिने मंगळावर पोहोचायला लागतील. तेथे पोहोचल्यानंतर अगोदरच पोहोचवलेल्या (२०२५ मध्ये) विविध गोष्टी आणि अन्न त्यांची वाट पाहात असेल. पहिल्या जथ्थ्याला तेथे बरेच काम करावे लागेल. यात सर्व सामग्रीची जुळवाजुळव करणे आणि निवारा व्यवस्थित करून राहण्यायोग्य बनवणे हे प्राधान्याचे काम असेल. या सर्व गोष्टींचे चित्रिकरण करून पृथ्वीवर प्रसारित करण्यात येईल. मार्स वनला यातुन मिळालेला पैसा पुन्हा पुढच्या गोष्टींसाठी वापरता येईल. हा "रिॲलिटी शो" इतर कार्यक्रमांपेक्षा खूपच प्रसिद्ध होईल असे मार्स वनचे मत आहे. मंगळावर राहण्यासाठी पृथ्वीसारखी मुबलक जागा उपलब्ध नसेल. याचे कारण म्हणजे राहण्याच्या घराच्या बाहेरच्या वातावरणात प्राणवायूचे अस्तित्व नसेल. त्यामुळे सुरुवातीच्या चार मंगळवासियांना एकत्र मिळून साधारण १००० घन मिटर जागा उपलब्ध असेल. पृथ्वीवरून मंगळाकडे जातानाच्या प्रवासात ही जागा अजूनच कमी म्हणजे साधारण ८० घनमीटर असेल. कमी असली तरी कोलंबसच्या साथीदारांना त्या काळात जहाजावर उपलब्ध असणाऱ्या जागेपेक्षा ही जागा जास्तच आहे! मात्र जागेपेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्राणवायू (Oxygen), पाणी आणि अन्न या गोष्टींचा. या गोष्टींसाठी मार्स वन मोहीमेत अचंबित करायला लावणारी योजना आखण्यात आली आहे. पाठवण्यात येणाऱ्या उपकरणांमध्ये मंगळावरील मातीमधून पाणी वेगळी करणारी उपकरणे पाठवण्यात येणार आहेत. माती गरम करून बाष्पीभवनाने हे पाणी वेगळे करायचे अशी ही योजना आहे. सर्वांना पुरेसे पाणी (५० लिटर्स रोज) अशा प्रकारे उपलब्ध करून दिले जाणार आहे. बरेचसे पाणी पुनर्प्रक्रिया करूनसुद्धा वापरण्यात येणार आहे कारण तुलनेने याला कमी उर्जा लागेल. त्याचप्रमाणे यातील काही पाणी प्राणवायू तयार करण्यासाठी वापरण्यात येईल. अडचणीच्या काळात वापरण्यासाठी पाणी आणि प्राणवायू यांचा वेगळा साठादेखिल ठेवण्यात येईल. बंद घरांमध्ये लागणारा नायट्रोजन मंगळाच्या वातावरणातून तसाच घेण्याची सोय असेल. मंगळावर पृथ्वीवरून सतत अन्नपुरवठा करत राहाणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे मंगळवासीयांना तिथेच अन्न तयार करावे लागेल. या अन्नात अगदी शेवाळे आणि काही किटकांचा समावेश असण्याची शक्यतादेखिल नाकारता येत नाही! घरांच्या आतमध्ये कृत्रिम प्रकाशाचा आणि मंगळाच्या मातीचा उपयोग करून सुमारे ८० चौरस मिटर्स भागावर झाडांची आणि भाज्यांची लागवड केली जाईल आणि याच अन्नावर त्यांना जगावे लागेल. मात्र जसजशी मंगळावरील लोकवस्ती वाढत जाईल तसतसे नवनवीन पर्याय नक्कीच उपलब्ध होतील.

मात्र कितीही सहनशील लोकांना मंगळावर पाठवले तरी अशा वातावरणात हे लोक खूप कंटाळणार हे उघड आहे. मग या लोकांनसाठी मनोरंजनाचे साधन? आधीच सांगितल्याप्रमाणे हे लोक पृथ्वीच्या सतत संपर्कात असतील. मात्र अंतर खूप असल्याने संपर्कात खूप विलंब होईल (साधारण १५ मिनिटे) आणि त्यामुळे तिथल्या लोकांना पृथ्वीवरील लोकांशी फोनवरून काही बोलता येणार नाही हे निश्चित. मात्र या लोकांना इंटरनेट उपलब्ध असेल आणि त्यामुळे इ-मेल्स, व्हाट्सॲप सारख्या गोष्टी त्यांना (पैसे न देता!) हव्या तेवढ्या वापरता येतील त्याचप्रमाणे बऱ्याचशा वेबसाईट्स सर्फ करता येतील. अगदी व्हॉइसमेल आणि व्हिडिओ संदेशदेखिल उपलब्ध असतील. त्यामुळे हे लोक जास्त कंटाळणार नाहीत अशी अपेक्षा आहे! 

हे सर्व ऐकून "मार्स वन" विषयी तुम्ही अतिशय उत्सुक झाला असाल. मी स्वत: मात्र या मोहिमेविषयी बराच साशंक आहे. त्याची कारणे मी आता सांगत नाही; तुम्ही इतरत्र याविषयी शोधण्याचा प्रयत्न करू शकता. मात्र एका गोष्टीविषयी मला पूर्ण खात्री आहे: आज नाहीतर उद्या मानवजात मंगळावर वास्तव्यास जाणार! तुम्हाला या मोहिमेविषयी काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की लिहा. 

No comments:

Post a Comment