Sunday, September 6, 2015

मायोरानांच्या आयुष्याचे रहस्य!

मागील वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकेमधील प्रिन्स्टन आणि टेक्सास विद्यापिठातील भौतिकशास्त्रज्ञांनी एक अनोखा शोध घोषित केला. लोखंडाच्या अणूंच्या साखळीच्या कडांवर मिथ्या-कणांच्या (quasi-particles) स्वरूपात आत्तापासून साधारणत: ७६ वर्षांपूर्वी एत्तोरे मायोराना (Ettore Majorana) या ३१ वर्षीय इटालियन भौतिकशास्त्रज्ञाने भाकीत केलेला एक विशिष्ट प्रकारचा भौतिक कण दिसून आल्याची ही घोषणा होती. "मायोराना फर्मिऑन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणाचे गुणधर्म अतिशय गुढ वाटावे असेच आहेत. मात्र हा लेख या कणाविषयी नसून कदाचित त्यापेक्षाही बऱ्याच जास्त गुढ बनून राहीलेला त्याचा जनक भौतिकशास्त्रज्ञ मायोराना याच्या आयुष्याविषयी आहे.


चित्र क्रमांक १ : एत्तोरे मायोराना
 एत्तोरे मायोरानांचा जन्म ५ ऑगस्ट १९०६ रोजी इटलीमधील कतान्या या शहरात झाला. आपल्या हुशारीच्या जोरावर अत्यंत तरुण वयातच त्यांना जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी (Enrico Fermi) यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सुरूवातीला अभियांत्रिकीच्या (Engineering) शाखेत प्रवेश घेतलेल्या मायोराना यांनी १९२८ मध्ये दुसरे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ इमिलिओ सिग्रे (Emilio Segrè) यांच्या आग्रहाखातर भौतिकशास्त्राकडे आपले लक्ष वळवले आणि सुरूवातीला आण्विक पंक्तिविज्ञानामध्ये (Atomic spectroscopy) संशोधन सुरू केले. इ.स. १९३३ मध्ये फर्मींच्या सांगण्यावरून मायोरानांनी इटलीचा निरोप घेतला आणि ते जर्मनीमध्ये निघून गेले. जर्मनीमध्ये त्यांची भेट अनिश्चिततेच्या तत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्या वर्नर हायझेनबर्ग (Werner Heisenberg) यांच्याशी झाली. मात्र तिथे तब्येत बिघडल्यामुळे काही महिन्यांच्या कालावधीमध्येच त्यांना इटलीमध्ये परतावे लागले. इटलीमध्ये परतल्यावर ते अत्यंत एकाकीपणे राहू लागले आणि अगदी स्वत:च्या आईलादेखिल भेटणे टाळू लागले. या काळात आपल्या संशोधन संस्थेमध्ये देखिल अत्यंत कमी वेळा ते हजर राहात असत. पुढच्या साधारण चार वर्षांमध्ये ते कधीही आपल्या मित्रांना भेटले नाहीत आणि काही संशोधनदेखिल प्रसिद्ध केले नाही अशी नोंद आहे.  परंतु या काळात त्यांनी भुरचनाशास्त्र, अभियांत्रिकी, गणित, सापेक्षता अशा अनेक विषयांवर लेख लिहीले परंतु प्रसिद्ध केले नाहीत.

इ.स. १९३७ हे साल मायोराना यांना या परिस्थितीमधून बाहेर काढेल अशी शक्यता निर्माण झाली होती. या साली त्यांची इटलीमधील नेपल्स भौतिकी संशोधन संस्थेमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तसे पाहायला गेले तर पूर्णवेळ प्राध्यापक होणे हे शिक्षणक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे आणि अवघड मानले जाते. त्यामुळे नेपल्सच्या या संस्थेमध्ये यासाठी एक विशिष्ट परीक्षा घेण्याची पद्धत होती. मात्र सैद्धांतिक भौतिकशास्त्रामध्ये आधी केलेल्या संशोधनामुळे मायोराना इतके प्रसिद्ध झाले होते की संस्थेने ही परीक्षा न घेताच त्यांची पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नेमणूक केली! याच काळात त्यांनी त्यांची शेवटची संशोधनपत्रिका प्रसिद्ध केली. हीच ती प्रसिद्ध पत्रिका ज्यामध्ये आत्ता "मायोराना फर्मिऑन" (Majorana Fermion) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणाचे भाकीत केले गेले आहे. त्यांच्या पुढील आयुष्यात जे काही घडले ते मात्र अत्यंत रहस्यमय आहे.

सन १९३८ च्या मार्च महिन्यात नेपल्स भौतिकी संशोधन संस्थेच्या संचालक ॲन्तोनिओ कार्रेल्ली यांना मायोरानांकडून आलेले पत्र मिळाले. या पत्रात साधारणपणे असे लिहीले होते:

"प्रिय कार्रेल्ली, मी आता अटळ होऊन बसलेला एक निर्णय घेत आहे. यामध्ये माझा काही स्वार्थ नाहीये आणि माझ्या बेपत्ता होण्याने तुमच्यावर आणि विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल याची मला कल्पना आहे. मागिल काही महिन्यांमध्ये तुम्ही दाखवलेल्या विश्वासाचा, मैत्रिचा आणि प्रेमाचा मी जो विश्वासघात करत आहे त्याबद्दल आपण मला माफ करावे अशी मी आपणांस विनंती करतो आहे. आपल्या संशोधन संस्थेमध्ये ज्या सर्वांशी माझी जवळीक निर्माण झाली आहे त्या सर्वांची आठवण किमान आज रात्रीच्या ११ वाजेपर्यंत मी नक्की ठेवेन. आणि जमल्यास त्यानंतरदेखिल... "

मात्र यानंतर काही वेळातच कार्रेल्लींना मायोरानाने पाठवलेली तार मिळाली. यामध्ये असे लिहीले होते:

"प्रिय कार्रेल्ली, माझे पत्र आणि ही तार तुम्हाला जवळपास एकाच वेळी मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो. समुद्राने मला नाकारले आहे आणि उद्या मी बोलोग्ना हॉटेलवर पुन्हा हजर असेल. पण मी शिकवणे सोडून देण्याचे ठरवले आहे. तुमच्या मदतीसाठी मी नेहमी हजर असेल."

 
चित्र क्रमांक २ : नेपल्स आणि पालेर्मो ही शहरे.
या दोन संदेशांवरून असे दिसते आहे की मायोरानांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा आणि नंतर तो रद्द केला असावा. मात्र दुसऱ्या दिवशी मायोराना आलेच नाहीत ! चौकशीअंती असे दिसून आले की मायोरानांनी आपल्या बॅंकेच्या खात्यातुन सर्व रक्कम काढून घेतली होती आणि २३ मार्चच्या रात्री ते नेपल्समधून इटलीमधीलच पालेर्मो या शहरात बोटने गेले होते. वर दिलेले पत्र आणि तार हे दोन्ही पालेर्मोमधून पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा नेपल्सला जाण्याची बोट घेतल्याचेही तपासात दिसून आले आहे. इटलीमधील ही दोन शहरे आणि मायोरानांच्या प्रवासाचा मार्ग मी चित्र क्रमांक २ मध्ये दाखवले आहेत. मायोरानांच्या समुद्री प्रवासाचा मार्ग काळ्या रेषेने दाखवला आहे.

मायोराना हे तसे सर्वच बाबतीत विक्षिप्त मनुष्य होते. स्वत: लावलेले शोध त्यांना बऱ्याचदा अतिशय साधारण वाटत आणि त्यामुळे ते शोध त्यांना प्रसिद्ध करणे महत्वाचे वाटत नसे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केवळ ९ संशोधनपत्रिका प्रसिद्ध केल्या आहेत. न्यूट्रॉन नावाच्या मुलभूत कणाचे अस्तित्व त्यांना सैद्धांतिकदृष्ट्या १९३२ मध्येच समजले होते. त्यावेळी एन्रिको फर्मींनी त्यांना हे संशोधन लवकर प्रसिद्ध करायला सांगितले होते मात्र नेहमीच्या बेफिकीर वृत्तीमुळे त्यांनी असे केले नाही. पुढच्याच वर्षी जेम्स चाडविक यांनी प्रयोगाने न्यूट्रॉनचे अस्तित्व दाखवून दिले आणि याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले! अशा प्रकारे अतिशय लहान वयात हे प्रतिष्ठेचे पारितोषिक जिंकण्याची संधी मायोरानांनी सोडून दिली होती.


 पण काय झाले असेल मायोरानांचे? त्यांच्या बेपत्ता होण्यानंतर अनेक अंदाज केले गेले आहेत. सर्वांत साधा म्हणजे त्यांनी आत्महत्या केली असावी. मात्र या अंदाजाला त्यांच्या घरच्यांनी पूर्ण विरोध केला आहे. मायोराना हे कॅथोलिक विचारसरणीमध्ये प्रचंड विश्वास करत असल्याने ते कधीच आत्महत्या करणार नाही असा कुटूंबियांचा दावा होता. तसेच जर आत्महत्याच करायची असेल तर बॅंकेतून सर्व पैसे काढून घेण्याची काय गरज होती असाही प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे त्यांचा खून झाला असावा, किंवा आण्विक अस्त्रांच्या शोधाचा सुगावा लागला असल्याने त्यांनी भौतिकशास्त्र सोडून दिले असावे, किंवा त्यांनी उरलेले आयुष्य एखाद्या आध्यात्मिक मठात व्यतित केले असावे, किंवा अगदी ते भिकारी बनले असावेत असे वेगवेगळे अंदाज लोकांनी वर्तवले आहेत! मात्र यांपैकी एकही अंदाज आजपर्यंत खरा आहे असे निर्विवाद सिद्ध झाले नाहीये.

अगदी अलिकडे, म्हणजे मार्च २०११ मध्ये इटालियन सरकारने हा खटला पुन्हा उघडला. एका व्यक्तिने दुसऱ्या महायुद्धानंतर मायोरानांना आपण भेटलो आहोत असा केलेला दावा हे यामागचे कारण होते. जून २०११ मध्ये इटालियन प्रसिद्धिमाध्यमांनी असे जाहीर केले की अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकेमधील देशामध्ये इ.स. १९५५ मधे घेण्यात आलेल्या एका छायाचित्रात दिसणारी एक व्यक्ती बरिचशी मायोरानांसारखी दिसते आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे! फेब्रुअरी २०१५ मध्ये इटालियन सरकारने अधिकृत घोषणा केली की मायोराना हे १९५५ ते १९५९ मध्ये जिवंत होते आणि व्हेनेझुआला देशाच्या व्हॅलेन्सिआ शहरात राहात होते! या नव्या शोधामुळे सरकारने अधिकृतरित्या हा खटला बंद झाल्याचे जाहिर केले असून यामध्ये कुठलाही घातपात नसल्याचे आणि बेपत्ता होण्याचे मायोरानांनी स्वत:च ठरवल्याचे म्हटले आहे. मात्र तरीदेखिल खरे काय आणि खोटे काय हे त्या एकट्या एत्तोरे मायोरानांनाच माहित!


4 comments:

  1. Truely Unfortunate..The way (mysterious) we lost this great mind.. :-(

    ReplyDelete
  2. Indeed mysterious ... How his mind was working and interpreting the world around ... !

    ReplyDelete